Site icon

नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले

नाशिक (घोटी) : राहूल सुराणा
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक हद्दीतील फळवीरवाडी येथील पाझर तलाव आठ महिन्यांपूर्वी ढगफुटीमुळे अचानक फुटला. तो अद्यापही नादुरुस्त आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या भागातील स्थानिक आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मिळेल तिथे भर उन्हात रानोमाळ पायपीट करावी लागत आहे.

फळवीरवाडी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेला पाझर तलाव.

पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून पाझर तलाव आठ दिवसांच्या आत तयार केला जाईल, असा शब्द मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिला होता. मात्र त्यांचे आश्वासन हवेत विरले आहे. जवळपास आठ महिन्यांचा कालावधी होऊनही फुटलेला पाझर तलाव अद्यापही नादुरुस्त आहे. प्रशासनाकडून कोणतीही हालचाल अद्याप झालेली नाही. नुकसानभरपाई शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. पाझर तलाव फुटल्यानंतर अनेक आदिवासी शेतकर्‍यांच्या जमिनी उभ्या पिकांसह पुरात वाहून गेल्या. शिवार रस्ते, विहिरी बुजून नेस्तनाबूत झाल्या. या घटनेची स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्षात पाहणी केली. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., तत्कालीन ग्रामीण पोलिस आयुक्त सचिन पाटील, तत्कालीन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, तहसीलदार परमेश्वर कासुळे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली होती. यंदा एप्रिलच्या आरंभी आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भरउन्हात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर आहे. परंतु अजूनही योजनांचे पाणी फळवीरवाडीत पोहोचलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी गुरांना कडवा धरणाकडे जावे लागत आहे.

सरकारला एकच विनंती आहे, लवकरात लवकर बंधारा दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई देऊन खरीप हंगामासाठी वाहून गेलेल्या व फुटलेल्या जमिनीची मशागत करण्यासाठी त्वरित मदत करावी. – लक्ष्मण भांगरे, नुकसानग्रस्त शेतकरी.

पाझर तलाव बंधारा फुटल्यापासून आजतागायत कोणीही याकडे लक्ष दिले नाही. बंधार्‍याच्या पाण्यावर आमची गुरे वासरे अवलंबून होती. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोजच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. – सुदाम कातोरे, शेतकरी, फळवीरवाडी.

मागील वर्षी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे पाझर तलाव फुटल्याने स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी उभ्या पिकांसह वाहून गेल्या. या नुकसानीचे पंचनामे झाले. नुकसानभरपाई मिळालेली नाही. वाहून गेलेला अडसरे बु. ते भंडारदरावाडी रस्ता दुरुस्त झालेला नाही. – किरण साबळे, शेतकरी, अडसरे बु.

हेही वाचा:

The post नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले appeared first on पुढारी.

Exit mobile version