Site icon

नाशिक : माहेरवाशीण गौराईंना निरोप; लाडक्या गणरायाचेही विसर्जन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माहेरी पाहुणचार घेणार्‍या माहेरवाशीण गौराईंना भाविकांनी सोमवारी (दि. 5) पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आर्जव करीत भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गौराईंसोबत लाडक्या गणरायाचेही विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषाने गोदाघाट दुमदुमला होता.

गौराईंच्या आगमनाने दोन दिवस घरांमध्ये चैतन्य आणि आनंदी वातावरण होते. भक्तांच्या घरी आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठांना दोन दिवस पुरणपोळी व पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला. रविवारी (दि.4) महापूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर सोमवारी (दि. 5) मूळ नक्षत्रावर जड अंत:करणाने गौराईंना निरोप देण्यात आला. तत्पूर्वी, सकाळी गौराईंना दही-भाताचा नैवेद्य दाखवित पुढील वर्षी सुख-समृद्धी आणि सोनपावलांनी आगमनाची प्रार्थना भक्तांकडून करण्यात आली.

माहेरवाशीण गौराईंसोबत घरोघरी मागील पाच दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायालादेखील अनेक गणेशभक्तांनी निरोप दिला. रामकुंड परिसर व गोदाघाटावर लाडक्या गणरायांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. याशिवाय सोमेश्वर, चोपडा लॉन्स, घारपुरे घाट, नवश्या गणपती मंदिर परिसर, तपोवन आदी ठिकाणी गणेश विसर्जन पार पडले. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेस नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील सहाही विभागांत उभारलेले कृत्रिम तलाव आणि मूर्ती संकलन केंद्रांमध्ये मूर्ती दान करीत पर्यावरण रक्षणाला हातभार लावला.

हेही वाचा :

The post नाशिक : माहेरवाशीण गौराईंना निरोप; लाडक्या गणरायाचेही विसर्जन appeared first on पुढारी.

Exit mobile version