Site icon

नाशिक : मुक्तिभूमी स्मारकाच्या कामांना मिळणार गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास समाजकल्याण विभागाकडून विविध योजनांतर्गत करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्तिभूमी स्मारक आणि औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासकामांसाठी शासनाने नुकताच सात कोटी ६५ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त योजना राबविण्यात येत आहे. राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाने सन २०२२-२३ या वर्षात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या नाशिक आणि औरंगाबाद येथील कामांसाठी यापूर्वीच ९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, तर नुकताच उर्वरित ७ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला आहे.

येवला येथील मुक्तिभूमी स्मारकाच्या कामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता असून, यापूर्वी ९ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. तर उर्वरित ५ कोटी ५९ लाख रुपये नुकतेच वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांना गती मिळणार आहे. तर औरंगाबादच्या नागसेनवश वसतिगृह व सभागृहाच्या विस्तारीकरणासाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या योजनेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आजमितीला ७ कोटी ६५ लाखांचा निधी संबंधित यंत्रणेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेला स्थळांच्या विकासाला गती मिळणार असून, लवकरच ही कामे पूर्ण होतील.

– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण विभाग

हेही वाचा :

The post नाशिक : मुक्तिभूमी स्मारकाच्या कामांना मिळणार गती appeared first on पुढारी.

Exit mobile version