Site icon

नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विषप्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः रुग्णवाहिका चालवून प्राण वाचवले.

डॉ. पवार या मंगळवारी (दि.28) ड्यूटीवर असताना रात्री ८.३० च्या दरम्यान मांजरगाव येथील 27 वर्षीय युवक विषप्राशन केलेल्या अवस्थेत दाखल झाला. डॉ. पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला पुढील उपचाराची गरज होती. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असूनही त्याचा चालक रजेवर असल्याने रुग्णाला निफाड येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते. यामुळे डॉ. प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेत असूनही मागचा पुढचा विचार न करता रात्री ८.३० च्या सुमारास आरोग्यसेवक संसारे यांना सोबत घेऊन स्वतः रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून स्टेअरिंग हातात घेत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी निफाड ग्रामीण रुग्णालय गाठले. रुग्णाला ताबडतोब पुढील उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

नेहमीप्रमाणे ड्यूटीवर असताना मंगळवारी सायंकाळी विषप्राशन केलेला रुग्ण दाखल झाला. रुग्णाची तब्येत गंभीर होती. त्याचे प्राण वाचवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी निफाड येथे नेणे गरजेचे होते. स्वतः रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सारथीची भूमिका केली. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे रुग्णाचे प्राण वाचले हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

– डॉ. प्रियंका पवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हाळसाकोरे.

हेही वाचा :

The post नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग appeared first on पुढारी.

Exit mobile version