Site icon

नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री’ची पीएसआय पदाला गवसणी

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर

येथील सरदवाडी रोड भागातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर गायत्री दिगंबर बैरागी हिने अथक परिश्रम करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गायत्रीवर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे.

गायत्रीने दहावीपर्यंतचे शिक्षण येथील वाजे विद्यालयात पूर्ण केले असून सिन्नर महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने नाशिक येथील के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेतला. गायत्रीने तेथेही छाप सोडत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. गायत्रीचे वडील एसटी महामंडळात नोकरीला असल्याने लहानपणासूनच तिला वडिलांचा खाकी पोषाख आकर्षित करत असे. त्यामळे पोलिस दलात जाण्याची तिची मनस्वी इच्छा होती. इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर तिला गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधीही आल्या होत्या. मात्र, शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न तिला खुणावत होते. तिची मोठी बहीण वृषाली शिक्षिका असून त्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्याने गायत्रीलाही प्रेरणा मिळत गेली. तसेच आई वडिल तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या भावानेही तिला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पाठिंबा दिल्याने तिचे मनोबल अधिकच वाढले व तिने पूर्ण तयारीनिशी या परीक्षांच्या अभ्यासास सुरुवात केली.

कुठलेही कोचिंग क्लास व अभ्यासिकेत न जाता गायत्रीने घरातच परीक्षांची तयारी केली होती. त्यामुळे सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी तिचा सत्कार करत यशाचे कौतुक केले. यावेळी माजी नगरसेवक हर्षद देशमुख, मयुरेश क्षत्रिय, सागर रायते, अतुल कणसे, सचिन वाघ, प्रशांत बोडके, मयुर पवार यांच्यासह गायत्रीचा भाऊ सागर बैरागी, वडील दिगंबर बैरागी यांच्यासह कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

शालेय जीवनापासूनच शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न होते. त्यात पोलिस होऊन देशसेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना जिद्द आणि चिकाटी बाळगली. आज लाखो तरुण-तरुणी या परीक्षांचा अभ्यास करतात. मात्र, काही हताश होऊन अर्ध्यावरच प्रयत्न सोडतात. मात्र तसे न करता प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे. –

गायत्री बैरागी

हेही वाचा : 

The post नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री'ची पीएसआय पदाला गवसणी appeared first on पुढारी.

Exit mobile version