Site icon

नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील “आपला दवाखान्या’चे उडाले छप्पर

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे गत दोन दिवसांपासून वादळी हवा सुरू आहे. बुधवारी सकाळी शासनाच्या ‘आपला दवाखाना’ थाटलेल्या इमारतीचे छप्पर उडाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

पावसाचा अधूनमधून होणारा शिडकावा आणि वादळी वारे यामुळे मान्सूनने दवंडी दिली आहे. मात्र, वादळी हवेमुळे घरांचे छप्पर उडण्याच्या घटना घडत आहेत. त्र्यंबकेश्वरला शासनाने आपला दवाखाना सुरू केला आहे. त्र्यंबक शहरात सरकारी उपक्रम राबविण्यासाठी जागा आणि इमारती शिल्लक राहिलेल्या नाहीत. पालिकेने व्यावसायिक गाळे आणि इमारती भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत. धर्मशाळा ठेकेदारीने दिलेल्या आहेत. मोकळे भूखंड अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत.

राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या रेट्यामुळे यंदा महाराष्ट्र दिनास ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यासाठी 1972 च्या दुष्काळात बांधलेले धान्य गोदाम उपलब्ध करून देण्यात आले. दगडी बांधकामातील या गोदामाची पुरती दुरवस्था झालेली आहे. मात्र, दवाखान्यासाठी रंगरंगोटी करून ते सजवण्यात आले. बुधवारी वादळी वाऱ्याने इमारतीचे छप्पर उडून गेले. गोदामाच्या भिंती केव्हाही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे. दवाखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी ग्रामस्थांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील वैद्यकीय पथक आणि उपचारासाठी आलेले रुग्ण यांच्या जीवाशी होणारा खेळ पाहता या गोदामातून दवाखाना तातडीने हलविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : वादळी वाऱ्याने त्र्यंबकमधील "आपला दवाखान्या'चे उडाले छप्पर appeared first on पुढारी.

Exit mobile version