Site icon

नाशिक : शहरातील दहा हजार वृक्ष खिळेमुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे २२ ते २८ एप्रिल हा वसुंधरा सप्ताह साजरा केला जात असून, या सप्ताहात मनपाच्या सहाही विभागांतर्गत ‘खिळेमुक्त वृक्ष’ अभियान राबविण्यात आले आहे. सुमारे दहा हजारांपेक्षाही अधिक वृक्ष खिळेमुक्त करण्यात आले आहेत. वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणाऱ्या २० पेक्षा अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची कारवाई करण्यात आली आहे. झाडांवरील खिळे काढण्याची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, झाडांवर खिळे ठोकून फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा मनपाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘अर्थ वीक’ घोषित केला आहे. त्यानुसार ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत मनपाकडून पर्यावरण संवर्धन करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. शुक्रवारी (दि.२८) सहा विभागांत उद्यान विभागाकडून वृक्षलागवड करून अभियानाचा समारोप केला जाणार आहे. दरम्यान, सप्ताहात २४ एप्रिल रोजी पंचवटी उद्यान विभागाअंतर्गत पेठ फाटा येथील नाल्यातील प्लास्टिक जमा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याशिवाय पश्चिम विभाग उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथे शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. विविध शाळांच्या पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निर्देशाने उद्यान विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान निरीक्षक आणि इतर कर्मचारी यांनी सदरचे उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील दहा हजार वृक्ष खिळेमुक्त appeared first on पुढारी.

Exit mobile version