Site icon

नाशिक : शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’च! ‘वंदे मातरम्’ कागदावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर संभाषण करताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा शासन निर्णय पारीत झाला असला, तरी शासकीय कार्यालयांमध्ये अद्याप ‘हॅलो’च म्हटले जात असल्याचे दै. ‘पुढारी’च्या निरीक्षणात आले आहे. दै. ‘पुढारी’ने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे दूरध्वनीवर संपर्क केला असता, समोरून ‘वंदे मातरम्’चा उच्चार कोठेही झाला नाही.

राज्य शासनाने दूरध्वनी किंवा समोरासमोर बोलताना, ‘हॅलो’, ‘हाय’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भातील आदेश शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले असून, त्यानुसार ‘वंदे मातरम्’ म्हणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी किंवा भ—मणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ या अभिवादनाने सुरुवात करावी, अशा सूचना शासनाच्या आहेत.
मात्र, याबाबत दै. ‘पुढारी’ने या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली की नाही, हे तपासण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या अधिकृत दूरध्वनीवर संपर्क केला असता, समोरून ‘हॅलो’चाच जागर होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधितांना ‘वंदे मातरम्’ची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला असता, ‘हो. आता सुरू होईल.’ असे उत्तर मिळाले.

प्रतिनिधीशी झालेला संवाद

स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय

वेळ : दुपारी 1 वा. 09 मि.
जिल्हाधिकारी कार्यालय : हॅलो…
‘पुढारी’ : वंदे मातरम् सर…
जिल्हाधिकारी कार्यालय : हो. सर
‘पुढारी’ : दै. ‘पुढारी’मधून बोलतोय… ‘वंदे मातरम्’ म्हणण्याबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली की नाही ते बघतोय…
जिल्हाधिकारी कार्यालय : हो सर… आता होईल.

स्थळ : जिल्हा परिषद कार्यालय

वेळ : दुपारी 1 वा.12 मि.
जिल्हा परिषद : हॅलो…
‘पुढारी’ : ‘वंदे मातरम्’ सर..
जिल्हा परिषद : सर, ते बाहेर गेले आहेत… एक तासाने फोन करा.
‘पुढारी’ : सर, दै. ‘पुढारी’मधून बोलतोय… ‘वंदे मातरम्’ म्हणण्याबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली की नाही ते बघतोय…
जिल्हा परिषद : हो सर… मी रजेवर होतो… आता बघतो..

स्थळ : महापालिका कार्यालय

महापालिका : हॅलो…
‘पुढारी’ : वंदे मातरम् सर..
महापालिका : वंदे मातरम् सर..
‘पुढारी’ : सर, दै. ‘पुढारी’मधून बोलतोय.. ‘वंदे मातरम्’ म्हणण्याबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली की नाही, ते बघतोय…
महापालिका : सुरक्षा विभागाला फोन लागला आहे.
‘पुढारी’ : हो सर..

आम्ही शासकीय कार्यालयात कामासाठी फोन करत असतो, आम्ही ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करतो, मात्र समोरून तसा प्रतिसाद येत नाही. जर तसा प्रतिसाद आला, तरच त्या शासन निर्णयाला अर्थ प्राप्त होईल. सर्वांनी तसा वापर करावा.
– चंद्रकिशोर पाटील,
नागरिक, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’च! ‘वंदे मातरम्’ कागदावर appeared first on पुढारी.

Exit mobile version