Site icon

नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंग त्र्यंबकनगरी पहाटेपासूनच शिवभक्तांच्या गर्दीने फुलली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्र्यंबकनगरीला पूर्ववैभव प्राप्त झाले. कुशावर्त येथे स्नानासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. पावसाच्या विश्रांतीची संधी साधत हजारो भक्तांनी ब—ह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. दुपारी 3 च्या सुमारास पालखी निघाली, तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना पालखीचे मनोहारी दर्शन घडले.

सकाळपासूनच त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती. पूर्व दरवाजा दर्शनबारीतून थेट बडा उदासीन आखाड्यापर्यंत रांग पोहोचली होती. बसस्थानक, वाहनतळ हे शहराबाहेर थेट दोन किमी अंतरावर ठेवण्यात आलेले आहे. तेथून पायी चालत आल्यानंतर उन्हाचा त्रास होत असल्याने वयोवृद्ध भाविकांनी रांगेतच बसकण मारलेली दिसत होती. 200 रुपयांच्या तिकिटासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रांग लागली होती. दुपारच्या वेळेस तिकीट खिडकी बंद केल्यानंतरही महिला जागेवर ठाण मांडून पुन्हा तिकीटविक्रीची वाट पाहात होत्या. पूर्व दरवाजाला दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी चर्चा केली असता, त्यांनी देवाच्या दारात व्हीआयपी दर्शनाची संस्कृती योग्य नाही, असे म्हणत याबाबत केंद्र शासनाला दूषणे दिली.

5 सेकंद दर्शनासाठी

देवस्थान ट्रस्टने रविवारी 10 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा केला आणि तो खरा असेल, तर मंदिर गर्भगृह खुले असल्याच्या जवळपास 14 तासांत एका भाविकाला जेमतेम 5 सेकंद दर्शनास मिळतात. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. दुपारी3 च्या सुमारास पालखी निघाली, तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना पालखीचे मनोहारी दर्शन घडले.

व्हीआयपींना रस्ता मोकळा 

शहराबाहेर वाहने उभी करण्याची सक्ती भाविकांना करण्यात आलेली आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, मंदिरासमोरच्या गर्दीत व्हीआयपींची वाहने मात्र बिनदिक्कत रस्ता काढत असलेली दिसत होती.

कलश दर्शनाने समाधान 

सोमवारी अनेक भाविकांनी कळसाचे दर्शन घेऊन माघारी जाणे पसंत केले. अनेकांनी येथे मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणे करून सोबत आणलेले प्रसाद, फुले, नारळ वाहता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. माहितगार भाविकांनी जुना महादेव, ऋणमुक्तेश्वर मंदिरात हात जोडत समाधान मानले आणि घरचा रस्ता धरला.

The post नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Exit mobile version