Site icon

नाशिक : शेतीत रानडुकरांचा हैदोस, दहिवडला डाळिंब बागेचे नुकसान

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने तालुक्यातील दहिवड येथील शेतकऱ्याचे डाळिंब बागेचे नुकसान झाले असून वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

देवळा तालुक्यातील दहिवड येथील सुनील व अनिल जगन्नाथ शिंदे यांचे वाखारी रस्त्यावरील सिंधओहळ शिवारात डाळिंब बाग आहे. शिंदे यांच्या डाळींब बागेला चांगला बहार आला आहे. मात्र, रानडुकरांनी आपला मोर्चा या डाळिंब बागेवर वळवल्याने काढणीला आलेल्या डाळिंब फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दहिवड परिसरात रान डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रान डुकरांनी डाळींबाच्या बागेत शिरून पिकाची नासधूस केल्याने  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच कांद्या सह इतर शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दुसरीकडे रान डुकरांच्यापायी होत असलेली नुकसान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे.

या परिसरात अनेक दिवसांपासून रान डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत असून, वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त बागेची पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात येत आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक एकर क्षेत्रावर डाळींब फळबागाची लागवड केली. एकूण १२० डाळींबाची झाडे असून, अत्यंत मेहनतीने बाग वाढवली आहे. यासाठी हजरो रुपये खर्च केला आहे. त्याला बहार चांगल्या प्रकारे आला असून, काढणीला आलेल्या या बागेत रानडुक्करानीं घुसून झाडं व फळांची मोठ्या प्रमाणावर नुकसान केली आहे. यात लाखो रुपयांची नुकसान झाली आहे. याचा पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी.
अनिल शिंदे, डाळींब उत्पादन शेतकरी, दहिवड

हेही वाचा :

The post नाशिक : शेतीत रानडुकरांचा हैदोस, दहिवडला डाळिंब बागेचे नुकसान appeared first on पुढारी.

Exit mobile version