Site icon

नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतीपिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीसाठी सलग ६ तास वीजपुरवठा करावा, अशाही सूचनाही त्यांनी केल्या.

गंगापूर रोडवरील आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात गुरुवारी (दि. २३) ना. भुसे यांनी महावितरण कंपनीची आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, सुहास कांदे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे, धनंजय आहेर, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड, जयंतीलाल भामरे, संजय तडवी, रामराव राठोड, सतीश बोंडे आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्याशिवाय त्यांची वीज खंडित करू नये. वीजबिल वसुली काही काळासाठी थांबवावी किंवा शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. शेतकऱ्यांना शेतीसाठी सलग ६ तास वीजपुरवठा द्यावा. जेणेकरून शेतीला पाणी देणे शक्य होईल. त्याचप्रमाणे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावेत आदी सूचनाही भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

कामांचा पाठपुरावा करावा : भुसे

नवीन सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी मंजूर झाले आहेत, तसेच ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ती कामे प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही ना. भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश appeared first on पुढारी.

Exit mobile version