Site icon

नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनोच्या संकटामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जुलै व ऑगस्ट या महिन्यात टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने २७ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर भर दिला आहे. संभाव्य टंचाई उद‌्भवल्यास सिन्नर तालुक्याला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

चालू वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांनी वर्तविला आहे. त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी यंत्रणा सरसावल्या आहेत. त्यानुसार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेने विशेष आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यांतील 2516 गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी प्राधान्याने टँकरवर भर दिला आहे. संभाव्य ३१९ टँकर दाखविले आहेत. त्यासाठी २२ कोटी ४३ लाख ८६ हजारांचा निधी प्रस्तावित आहे. अन्य उपाययोजनांमध्ये विहीर अधिग्रहण, विंधन विहीर, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. दरम्यान, आराखड्यात सिन्नरला सर्वाधिक टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता असून, टंचाई उद‌्भवल्यास तालुक्यासाठी १०९ टँकर प्रस्तावित केले आहेत. नांदगावसाठी ४९, बागलाणसाठी ४२ व चांदवडमध्ये २९ टॅंकर प्रस्तावित आहेत. येवला व सुरगाण्यात प्रत्येकी २२ व इगतपुरीत १२ टॅंकरची गरज भासू शकते. अन्य तालुक्यांत एक आकडी टँकरची संख्या प्रस्तावित आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Exit mobile version