Site icon

नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला ‘हा’ तोडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षीच सराफ बाजारात पाणी साचत असल्याने, व्यापार्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. अशात मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी सातत्याने सराफ व्यावसायिकांकडून केली जात होती. दरम्यान, मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या भागाची पाहणी करून सरस्वती नाल्यामुळे या भागात पाणी साचत असल्याने नाल्यावर गेट लावून नाले मार्गाने येणारे पाणी रुंद मार्गाने पावसाळी गटार योजनेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई नाका, सारडा सर्कल, दूधबाजार, भद्रकाली, प्रकाश सुपारी व पुढे दहीपूलमार्गे नैसर्गिक नाला गोदावरी नदीपात्राच्या बाजूने ड्रेनेजला जोडण्यात आला आहे. मेनरोडपर्यंत सरस्वती नाला रुंद आहे. परंतु ड्रेनेजच्या जोडणीपर्यंत नाल्याचे तोंड अरुंद होत जाते. परिणामी, पावसाळ्यात वरच्या बाजूला पाण्याचा प्रवाह जितका अधिक असतो, त्यापेक्षा कितीतरी पटींनी पाण्याचा प्रवाह मंदावतो. त्यामुळे वरच्या बाजूला म्हणजे मेनरोडवरील पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूने आलेल्या सरस्वती नाल्यात पाण्याचा फुगवटा तयार होऊन नाल्यातील पाणी उसळी घेते. परिणामी, बाहेर येऊन तळे साचते. सराफ बाजार, दहीपूल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पुरसदृश परिस्थिती निर्माण होते.

दरवर्षी अशाची परिस्थिती निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने आयुक्त रमेश पवार यांनी सरस्वती नाला पुढे ज्या भागात मिळतो त्या भागापासून ते मुंबई नाका या दरम्यान पायी प्रवास करून नाल्याची पाहणी केली. ड्रेनेजच्या तोंडावर बॉटलनेक म्हणजे नाला अरुंद होत असल्याचे निदर्शनास आले. सरस्वती नाल्यावर गेट तयार करून पावसाळ्यात ते पाणी रुंद नलिकेच्या माध्यमातून गोदावरीकडे वळविले जाणार आहे. जेणेकरून फुगवटा तयार होऊन पाणी साचणार नाही. बांधकाम व ड्रेनेज विभागाने तातडीने गेट बसविण्याच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या. दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीकडूनदेखील गावठाणातील 131 रस्त्यांची शिल्लक राहिलेली कामे पूर्ण झाल्यानंतर सराफ बाजारातील पाण्याचा निचरा लवकर होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सराफ बाजार व दहीपूल भागाला दरवर्षी पडणारा पाण्याचा वेढा कायमस्वरूपी सैल होणार आहे.

सरस्वती नाल्याची पाहणी केल्यानंतर बॉटलनेकमुळे फुगवटा तयार होऊन वरच्या बाजूला नाल्यातील पाणी बाहेर येते त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे गेट बंद करून ते पाणी पुढे रुंद मार्गाने काढले जाईल.
– रमेश पवार, आयुक्त, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला 'हा' तोडगा appeared first on पुढारी.

Exit mobile version