Site icon

नाशिक : साठविलेल्या कापसातील अळ्यांमुळे त्वचारोगाची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी साठविलेल्या कापसामध्ये अळ्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थांना त्वचारोग होण्याची भीती तयार झाली आहे. सोमवारी (दि. १३) तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह पथकाने पाहणी करताना, त्यांना या अळ्यांमुळे त्रास झाला.

याबाबतचा अहवाल तयार करून राहुरी कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. जास्त दर मिळेल या आशेवर टोकडे गाव व परिसरातील शेतकऱ्याने राहात असलेल्या घरातच ५ ते ५० क्विटल कापूस साठवून ठेवला. साठवून ठेवलेल्या कापसातून न दिसणाऱ्या सूक्ष्म किडीमुळे घरातील सर्वांना अंगाला खाज व अंगावर लालसर डाग, फोड येणे, जखमा होणे असे आजार पसरले. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.

त्यांच्या पाहणीनंतर सोमवारी (दि. १३) तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आणि पथक येथे पाहणीसाठी गेले असता त्यांनाही या अळ्यांच्या स्पर्शाने त्रास होऊ लागल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. नागरिकांशी चर्चा करून त्यावरून अहवाल तयार करण्यात येणार आहे. याबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे.

मालेगाव तालुक्यात साठवलेल्या कापसाची पाहणी केली. कापसामध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव आढळला असून, आम्हालाही त्रास सुरू झाला. याबाबत राहुरी कृषी विद्यापीठ आणि नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राकडे अहवाल पाठवून | मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे.

बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषि अधिकारी मालेगाव

The post नाशिक : साठविलेल्या कापसातील अळ्यांमुळे त्वचारोगाची भीती appeared first on पुढारी.

Exit mobile version