Site icon

नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

येथील चौकाचौकांत, उद्यानांत तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढल्याने अखेर अंबड पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत सिडकोतील शिवाजी चौक, बडदेनगर, महाकाली चौक, साईबाबा नगर, पवननगर या भागांत कारवाईचा बडगा उचलला आहे. सोमवारी (दि.12) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईने टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सिडको परिसरातील विविध भागांत टवाळखोरांनी उपद्रव माजवला आहे. दिवसेंदिवस हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. महिलांची छेडछाड, रस्त्याने होणारी आरडाओरड, उद्यानांमध्ये बसणारे मद्यपी, तसेच रस्त्याने शिवीगाळ करणाऱ्या मोकाट टवाळखोरांचा त्रास वाढत होता. यामुळे अंबड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले तसेच पोलिस अंमलदार, कर्मचारी या ताफ्यासह टवाळखोरांवर कारवाईची मोहीम सुरू केली. यात जुने सिडको भागातील ठाकरे उद्यान, बडदेनगर ते पाटीलनगर, साईबाबा नगर, महाकाली चौक व पवननगर भागांत सोमवारी सायंकाळी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Exit mobile version