Site icon

नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचा उद्या षोडशी सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांचा स्मृती सौरभ (षोडशी) सोहळा रविवारी (दि. 23) होणार आहे. यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे आनंद आखाड्यात हरिनाम सप्ताह सुरू आहे. या षोडशीनिमित्त रविवारी (दि. 23) सकाळी 9 ते 11 कीर्तन व सकाळी 11 नंतर भंडारा होणार आहे, अशी माहिती महंत शंकरानंद सरस्वती व गणेशानंद सरस्वती यांनी दिली.

श्री विद्येचे साधक असलेले स्वामी सागरानंद सरस्वती यांनी 8 ऑक्टोबरला देह सोडल्यानंतर आनंद आखाडा येथे समाधीस्थळी रोज भजन, कीर्तन, हरिपाठ व प्रवचन आदी कार्यक्रम होत आहेत. संन्यासी परंपरेनुसार 16 व्या दिवशी रविवारी (दि. 23) षोडशी सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्वामी सागरानंद सरस्वती यांचा राज्यभरात मोठा शिष्यवर्ग असल्याने षोडशी सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले.

स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या समाधीस्थळी सप्ताह काळात रोज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमत भागवत निरुपण, कीर्तन, प्रवचन, भजन असे कार्यक्रम सुरू असून, नामवंत कीर्तनकार तेथे सेवा रुजू करीत आहेत. आनंद आखाड्यात रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत विकासानंद मिसाळ यांचे कीर्तन होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचा उद्या षोडशी सोहळा appeared first on पुढारी.

Exit mobile version