Site icon

राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलांच्या हातात आज ज्या लेखण्या आहेत, त्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या आहेत. त्यामुळे आपण काय लिहिले पाहिजे याचे भान स्त्रियांनी ठेवले पाहिजे. महावीरांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या कल्याणासाठी पूल तयार केला असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथी कार्यकर्त्या व कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी केले.

साहित्यसखीच्या चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी स्त्री मंडळ सभागृहात त्या बोलत होत्या. शेख म्हणाल्या की समता, माणूसकी, एकात्मता साहित्यिकांनी याचा विचार करून साहित्यिकाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. शोषित बाईला सहानुभूती दिली जाते पण बंडखोर बाईला व्यभिचारी म्हटले जाते. संस्कृती ही नेहमी बदलत असते आणि ती परिवर्तनशील असली पाहिजे. नियम मोडण्यासाठी असतात आणि ती मोडण्याची ताकद महिलांमध्ये असते. महिला साहित्यातून कुणाला नजर देऊ शकत नसतील तर त्या साहित्याला महत्त्व राहत नाही. त्याचबरोबर पुरुषांच्या भावनिक अंगाचे चित्रण साहित्यात आले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. छाया लोखंडे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना साहित्यात मांडल्या गेल्या तरच साहित्य समृद्ध होईल. स्वत:ला कधीही कमी लेखू नका. स्वत:चा सन्मान करायला शिका तर समाज तुमचा सन्मान करेल. आजची स्त्री ही वर्तुळाबाहेर गेली आहे. प्रत्येक स्त्रीने इतर स्त्रियांना नेहमी प्रेरणा दिली पाहिजे असे लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, साहित्यसखीच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जाधव यांनी ‘मी अरुणा बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी डॉ. सीमा गोसावी, अलका कुलकर्णी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आरती डिंगोरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या appeared first on पुढारी.

Exit mobile version