Site icon

राष्ट्रीयकृत बॅंका आळशी, जाड कातड्याच्या : नरेंद्र पाटलांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीयकृत बॅंका आळशी, जाड कातड्याच्या असल्याची जहरी टीका अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाची आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रीयकृत बॅंकावर चांगलाच निशाणा साधला. या बैठकांना अनेक बँकांनी पाठ फिरविल्याने अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. संबंधीत बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

कर्ज घेण्यासाठी येणारा व्यक्ती कर्ज बुडविणारा असल्याची मानसिकता बँकांच्या अधिकाऱ्यांची असल्याचे सांगत कर्ज न देणाऱ्या बँकांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच गेल्या चार वर्षात राष्ट्रीयकृत बँकांच्या आडमुठे धोरणामुळे कर्ज वितरण आणि लाभार्थी यांची संख्या असमाधानकारक असल्याचे सांगितले.

आढावा बैठकिला कॅनरा बँक, एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, पंजाब सिंध बँक यांनी दांडी मारली असल्याने या ५ बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. बँका बैठकांना उपस्थित राहत नसतील तर कर्ज कशा देतील याबाबत बोलताना त्यांनी बँकावर कारवाई करत मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

शासनाची जी जाहीरात प्रसिद्ध झाली त्यावर प्रतिक्रीया देताना, सरकार दोन्ही बाजूने काम करत आहे. त्यांच्यामध्ये कोणी लुडबुड करू नये. संबंधीतांनी तुलना करून उंची कमी करू नये. ज्या विभागाने जाहीरात देउन खोडसाळपणा केला ते याबाबत माहीती देतील. याबाबत जे विरोध करत आहेत त्यावर आम्ही चर्चा करणार नाही. शासनात शिंदे आणि फडणवीस या दोघांचे काम चांगले आहे. तरी माझे नेते हे देवेंद्र फडणवीसच असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post राष्ट्रीयकृत बॅंका आळशी, जाड कातड्याच्या : नरेंद्र पाटलांची टीका appeared first on पुढारी.

Exit mobile version