Site icon

रिझर्व्ह बँकेचे गिरणा सहकारी बँकेवर निर्बंध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका बँकेवर निर्बंध घातले असून, त्यामध्ये नाशिकमधील नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधामुळे गिरणा बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. हे निर्बंध तूर्तास सहा महिन्यांकरिता लादण्यात आल्याने, खातेदारांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, बँकेची आर्थिक स्थिती सदृढ नसल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेने याबाबतचे निर्बंध लादले आहेत.
खातेदारांना दिलासादायक बाब म्हणजे बँकेच्या 99.53 टक्के खातेदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. विमा आणि पत हमी योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतच्या या ठेवींबाबत ग्राहकांना चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध निकषांचे पालन न करणार्‍या, बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अशा प्रकारची कारवाई होत असते. बँकेचे खातेदार, ठेवीदार यांची बँकेत जमा असलेली पुंजी सुरक्षित राहावी आणि बँकेचे व्यवहारदेखील सुदृढपणे नेहमीच सुरू राहावेत, याकरिता ही कारवाई केली जाते. बँकेची आर्थिक स्थिती ढासळली असून, ती पूर्ववत होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने या आदेशात म्हटले आहे.

बँकेत ग्राहकांची असलेली बचत, चालू खाती किंवा ठेवी या कुठल्याही खात्यातून बँकेची आर्थिक परिस्थिती सुदृढ होईपर्यंत पैसे काढता येणार नाहीत. मात्र, ठेवींवरील कर्जाचे समायोजन करण्यास मान्यता आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार स्पष्टपणे असे दिसते की, ही बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणालाही कर्ज देऊ शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण करू शकत नाही तसेच नवी गुंतवणूकही करू शकत नाही.

हेही वाचा :

The post रिझर्व्ह बँकेचे गिरणा सहकारी बँकेवर निर्बंध appeared first on पुढारी.

Exit mobile version