Site icon

Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या वतीने निफाड साखर कारखान्याच्या जागेवर मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. त्यासाठी आम्ही 2019 पासून प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना वेळोवेळी खो घालण्याचे काम राज्यातील तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीने केले होते. त्यामुळेच हा प्रकल्प रखडला होता, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. आता राज्यात आमचे सरकार आले असल्याने हा प्रकल्प वेगाने पूर्ण होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध विभागांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या वतीने निफाड साखर कारखान्यावरील जागेवर मल्टी मॉडेल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जेएनपीटी व एनएचआय यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे सुमारे 100 एकर जागेवर उभारला जाणारा हा प्रकल्प निसाकासाठी वरदान ठरू शकेल.

मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमधील 100 एकर क्षेत्रातून फळे, भाजीपाला निर्यातीला मोठी संधी मिळणार आहेत. निसाकाची स्थावर मालमत्ता तीनशे कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. ड्रायपोर्ट प्रकल्प हा मल्टी लॉजिस्टिक पार्क साकारून निसाकावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असेदेखील ना. डॉ. पवार यांनी सांगितले.

प्रकल्प अंतिम टप्प्यात
हा प्रकल्प गेला, तो प्रकल्प गेला अशी ओरड ऐकू येत असते. हा प्रकल्प अतिशय शेवटच्या टप्प्यात आहे. त्याचे काम सुरू झाल्यावर समजेलच नाशिकमध्ये कोणता प्रकल्प आला आणि याचे श्रेय कोणाचे आहे, असादेखील टोला त्यांनी उल्लेख न करता विरोधकांना लगावला.

हेही वाचा :

The post Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला appeared first on पुढारी.

Exit mobile version