Site icon

Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कलाकार म्हणून नाटक, सिनेमा, मालिका केल्या पण गेला माधव कुणीकडे नाटक करत असताना एक लाइन सापडली आणि तीच लाइन पकडत नाटकांमध्ये जास्त रमत गेलो, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या सिनेमात कमी झळकण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर देताना दामले यांनी त्यामागील कारणे उलगडून सांगितली. दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने अभिनेता प्रशांत दामले यांना अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते कालिदास कलामंदिर येथे अक्षय्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. दामले पुढे म्हणाले, नाटक सिनेमे करत असताना सिनेमाच्या शेड्युलमुळे नाटकाचा ग्रुप फुटण्याची शक्यता असते. १९९२ पासून ते आजपर्यंत माझी बॅकस्टेजची टीम आजही तिच आहे. त्यांच्याबरोबर एक ट्युनिंग सेट झालेली असते. त्यामुळे नाटकाचा प्रयोग खणखणीत होतो.

आवाजासाठी काय पथ्यपाणी पाळता? यावर दामले म्हणाले, आत्तापर्यंत १२,५५७ प्रयोग झाले पण एका विशिष्ट वयात काम करण्याची अति हाव असते आणि तो हावरटपणा नडला. कामाचा परिणाम शरीरावर व्हायला लागल्यावर २०१३ पासून कटाक्षाने प्लॅनिंग करत गेलो आणि महिन्याला २० ते २३ नाटकांचे प्रयोग करायचे असे ठरवले. घरात संगीताला ओहोटी लागल्यांनतर घरच्यांचा नाटक, गायनाला विरोध होता. पण दहावीत असताना गायनात बक्षीस मिळाले. त्यामुळे शिकलेले काही वाया जात नाही आणि काय गायचे नाही ते कळले. संगीताचे शिक्षण घेतले नाही पण छान कान तयार झाला. त्यामुळे अशोक पत्कींबरोबर ६३ गाणी आत्तापर्यंत गायली असल्याचे ते म्हणाले. रवींद्र कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अमृता कविश्वर यांनी सूत्रसंचालन केले. अमिता भट यांनी आभार मानले.

नाटकाचे तिकीट दर कमी व्हावे!
नाटकांचे तिकिट दर अधिक असल्यामुळे ते सर्वसामान्य माणसाला परवड नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षक कलाकारापासून दुरावला आहे. त्यासाठी नाटकांना अर्धा प्रायोजक देवुन नाटकाचे दर कमी करावे जेणेकरून सामान्य तळागाळातल्या प्रेक्षकाला पहिल्या रांगेत बसुन नाटक बघायला मिळेल. अशी विनंती दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी प्रशांत दामले यांना केली.

हेही वाचा :

The post Nashik :... अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले appeared first on पुढारी.

Exit mobile version