Site icon

Nashik : चि. कांदा यांचा अग्निडाग समारंभ; कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याने ठेवला कार्यक्रम

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा भगवान डोंगरे या युवा शेतकऱ्याने ६ मार्च २०२३ रोजी शेतातील उभ्या कांदा पिकाला अग्निडाग देण्याचे ठरविले असून, याबाबत समारंभाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आग्रहाचे निमंत्रण पाठविले आहे.

या पत्रात म्हटले की, आज वाघासारख्या शेतकऱ्याला राजकारण्यांमुळे कुत्र्यासारख मरण पत्कराव लागत आहे. शेतकऱ्यांपुढे लाइट, हमीभाव, सिंचन आरोग्य, शिक्षण, मुला-मुलींचे विवाह असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतक्याला कांदा रडवतोय, मात्र राजकारणी केवळ सत्ता संघर्षात धुंद झाले आहेत. आज कांद्याचा उत्पन्न खर्च निघत नाही. एकरी ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याला केंद्रातले भाजप सरकारला काही देणे-घेणे राहिलेले नाही. सध्या आपण दिल्ली दौरा दोन दिवसाआड करत आहात. मात्र, कधी शेतकऱ्यांसाठी दिल्ली दौरा करा, अशी विनवणी त्यांनी पत्रकात केली आहे. जर आपण शेतकऱ्यांसाठी काही करणार नसाल तर आपणास हात जोडून विनंती आहेत की, आपण किमान माझ्या शेतातील कांदा अग्निडाग कार्यक्रमास अावर्जून हजर राहावे, अशी विनवणी केली आहे.

गेल्या वर्षी शेतातील कांदा पेटविला

कृष्णा भगवान डोंगरे यांनी मागील वर्षीदेखील शेतातील उभा कांदा पेटवून दिला होता. त्यावेळी अनेक नेत्यांनी भेटी देऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या शेतकऱ्याने अर्धनग्न अवस्थेतही आंदोलन केले होते. डोंगरे यांनी आता कांदा अग्निडाग समारंभाच्या पत्रिका छापल्या आहेत. त्यामुळे ही निमंत्रण पत्रिका चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.

होळीच्या मुहूर्तावर 6 मार्च 2023 रोजी हा अग्निडाग कार्यक्रम होणार आहे. पत्रिकेत आशीर्वाद भाजप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. डाॅ. भारती पवार यांची नावे टाकली आहेत. तर प्रेक्षक म्हणून महाराष्ट्रातील सर्व मीडिया, तर संयोजक म्हणून सर्व शेतकरी यांचा पत्रिकेत समावेश आहे. तर निमंत्रक म्हणून कृष्णा डोंगरे, ज्योती डोंगरे यांची नावे आहेत. समारंभ ठिकाण मातुलठाण, नगरसूल (ता. येवला. जि. नाशिक) असे आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : चि. कांदा यांचा अग्निडाग समारंभ; कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याने ठेवला कार्यक्रम appeared first on पुढारी.

Exit mobile version