Site icon

Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नायलॉन मांजामुळे गोदाघाटावर वृद्धाचे दोन्ही पाय कापल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी वृद्धास सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल केल्याने धोका टळला आहे.

त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी मदनलाल चंपालाल भुतडा (७०) हे मंगळवारी (दि. २७) सायंकाळी 4 च्या सुमारास गौरी पटांगणावरून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. यात इतर नागरिकांचेही पाय अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र मांजा ओढला गेल्याने मदनलाल भुतडा यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव (रा. विनयनगर) यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नायलॉन मांजास बंदी असतानाही चोरट्या मार्गाने त्याची विक्री होत आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नसल्याने मनुष्य व पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे. सातपूर येथील तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला होता. पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घातली आहे. त्यांनी विक्रेत्यांवर कारवाई केली असली, तरी नायलॉन मांजाचा वापर सुरूच असल्याचे दिसते.

   नायलॉन मांजा घातक असून आज त्याचे गंभीर परिणाम स्वत: पाहिले आहेत. पतंगप्रेमींनी नायलॉन मांजा वापरू नये व प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर ठोस कारवाई करावी.

-प्रवीण जाधव

The post Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय appeared first on पुढारी.

Exit mobile version