Site icon

Nashik : त्र्यंबकनगरीत भाविकांची अलोट गर्दी, दर्शनासाठी तब्बल पाच तासांची प्रतीक्षा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
श्रावण महिना आणि रविवारची सुटी असा योग साधत भाविकांनी त्र्यंबकेश्वरला अलोट गर्दी केल्याने त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल पाच तास लागले.

कोरोनाचे सावट बर्‍यापैकी दूर झाल्याने यंदा रविवारी पहाटेपासून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे आज त्र्यंबकनगरीत दाखल झाले. पोलिस यंत्रणेने पार्किंगचे नियोजन केल्याने नवीन वाहनतळ वाहनांनी फुलले होते. पे आणि पार्क तत्त्वावरील वाहनतळांच्या काही ठिकाणी पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था नसल्याने वाहने गाळात फसली. ती बाहेर काढण्यासाठी भाविकांचा अर्धा दिवस खर्ची पडला.

श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर झालेली भक्तांची अलोट गर्दी (छायाचित्रे- देवयानी ढोन्नर)
त्र्यंबकेश्वर मंदिर

वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहनतळांच्या जागा निश्चित करत रस्ते बॅरिकेडिंगने बंद करण्यात आले होते. मात्र, त्याचा मनस्ताप स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागला. रिंगरोडवर कैलास राजा नगर गेट पार्किंग म्हणून घोषित केले आणि तो रस्ता गावात जाण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. असाच प्रकार जव्हार रस्त्याने वाहने शहरात जाण्यासाठी बंद केली होती. वास्तविक शहराचा विस्तार आता वाढलेला आहे. रिंगरोड आणि जव्हार रस्त्यालगत नववसाहती झाल्या आहेत. नागरिक या वसाहतींमध्ये वास्तव्यास आहेत. व्यवसाय, देवदर्शन, भाजीपाला, बाजारहाट करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना या रस्त्यांचा वापर करावा लागतो. नेमके तेच रस्ते बंद करण्यात आल्याने रहिवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागली.

जय्यत तयारी 

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवारसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर-परिसर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. तसेच यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन समितीसह त्र्यंबक नगर परिषद आणि तहसील कार्यालयाकडून शहरात विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. पोलिसांकडूनही बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : त्र्यंबकनगरीत भाविकांची अलोट गर्दी, दर्शनासाठी तब्बल पाच तासांची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Exit mobile version