Site icon

Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कष्ट करून देशाला बलशाली बनविण्यासाठीच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत शुक्रवारी (दि.१२) शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे करण्यात आला. त्याप्रसंगी ना. दानवे-पाटील बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., नाशिक मनपाचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, मनपा शिक्षण अधिकारी सुनिता धनगर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी

ना. रावसाहेब दानवे-पाटील पुढे म्हणाले की, दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाने व आपण सर्वांनी खूप काही गमावले आहे. परंतू पुढील वर्षांमध्ये प्रयत्नांची पराकाष्टा करून देशाला बलशाली बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. या नियोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन देश प्रगतीच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही दानवे-पाटील दानवे यांनी सांगितले.

‘स्वराज्य महोत्सव’अंतर्गत जिल्हा प्रशासन, नाशिक महानगरपालिका, पोलिस प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थी शालेय गणवेशात हातात तिरंगा घेवून ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थीदेखील प्रभात फेरीच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शहरातील विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील appeared first on पुढारी.

Exit mobile version