Site icon

Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा :
जून महिना अर्धाच्या वर संपला तरी पेरणीयोग्य पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला तर शंभर टक्के पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येते. यंदा जूनचा पंधरवाडा उलटला तरी दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत. वेळेवर पाऊस झाल्यास सात जूनच्या आसपास मुग, उडीद, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी झाल्यास शेतमालाचा उतारा चांगला येत असे ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या वर्षी सात जूनच्या पेरणीची मुहूर्त हुकल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. दररोज सकाळी सोसाटयाचा वारा, दुपारी ऊन, सायंकाळी पावसाचे दाटून आलेले काळे ढग आणि रात्री आकाशात चांदणे पडत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ऊन सावलीच्या खेळाने शेतकऱ्यांचा जीव टांगतीला लागला आहे.

बाजार पेठेत शुकशुकाट
पाऊस पडताच पेरण्या करून खते घेण्याची शेतकरी तयारी करतो. कोटयावधी रूपयांचा उलाढाल खतांच्या बाजारपेठेत होते. जून महिना सुरू होऊनही बाजारपेठेत शांतता आहे. बियाणे खते विक्रेत्यांना पाऊस पडल्यानंतर बोलायला वेळ नसतो, एवढे ग्राहक त्यांच्याकडे असतात.

जून महिन्यातील पंधरा दिवस उलटूनही अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. वेळेवर पाऊस पडला नाही व पेरणी उशिरा झाली तर याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.
इदर महाले,  शेतकरी कनाशी

हेही वाचा : 

The post Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Exit mobile version