Site icon

Nashik : सुरगाणा आंदोलन स्थगित ; पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील गावांसह तालूक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. स्थानिक स्तरावरील समस्या आठ दिवसात मार्गी लावताना राज्य पातळीवरील मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुराव्याचे आश्वासन देताना नियुक्तीच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही भुसेंनी यंत्रणांना दिले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहिर केले.

कर्नाटकचा सीमावाद चिघळला असताना आमच्या भागाचा विकास करावा, अन्यथा आमचा गुजरात मध्ये समावेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सुरगाण्यातील १३ गावांमधील ग्रामस्थांनी केली. या ग्रामस्थांनी सोमवारी (दि.५) गुजरातमधील वसादा तहसिलदारांची भेट घेत समावेशासाठी निवेदन दिले. त्यामुळे या संपूर्ण वादावर ताेडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबंधित ग्रामस्थांशी मंगळवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिपच्या सीईओ आषिमा मित्तल, राष्ट्रवादीचे तालूकाध्यक्ष तथा संघर्ष समितीचे चिंतामण गावित यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

The post Nashik : सुरगाणा आंदोलन स्थगित ; पालकमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा appeared first on पुढारी.

Exit mobile version