Site icon

Nashik Crime : ग्रामीणमधील गुटखाविक्रेते पोलिसांच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागात गुटखा साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार गेल्या पाच दिवसांत ३९ गुन्हे दाखल करून लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे तसेच संशयितांची धरपकड केली आहे. ग्रामीण पोलिसांच्या या मोहिमांमुळे गुटखाविक्रेते व साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ग्रामीण पोलिस दलाने काही दिवसांपूर्वी अवैध मद्यसाठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला तसेच दारू अड्ड्यांवर कारवाई करीत दारू तयार करणाऱ्यांची पाळेमुळे सैल केली. या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री व दारू तयार करणाऱ्यांची आर्थिक साखळी खिळखिळी झाल्याचे बाेलले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी गुटखा विक्री व साठा करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार दि. ६ ते १० जून या कालावधीत ग्रामीण पोलिसांनी 40 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून गुटखा साठा, विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यानुसार किराणा दुकान, पानटपरीवर तपासणी करीत गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच गुटखा साठा व वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. त्यानुसार ३९ गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नागरिकांसाठी संपर्क क्रमांक

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व ३०० अंमलदारांचे पथक आहे. गुटखाविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच गुटख्याविषयी तक्रार करण्यासाठी नागरिकांनी ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : ग्रामीणमधील गुटखाविक्रेते पोलिसांच्या रडारवर appeared first on पुढारी.

Exit mobile version