Site icon

Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा 
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे गाळ्यांमध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला सुमारे 20 लाख रुपये किमतीचा अवैध पानमसाला जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाई नंतर पुन्हा एकदा जानोरी येथील औद्योगिक वसाहतीत चालत असलेल्या अवैध धंद्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

जानोरी ग्रामपंचायतीने यासंदर्भात दिंडोरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्याने दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली. नव्याने नियुक्त झालेले पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.  अवैध धंदे समुळ नष्ट करण्यासाठी पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. काही दिवसांपूर्वी जानोरी औद्योगिक वसाहतीत जवळपास 1 कोटी किेंमतीच्या अवैध डिझेल सदृश्य साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई केली होती. जानोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेल्या या अवैध धंद्याविषयी जानोरी ग्रामपंचायत अनभिज्ञ होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्याकडून कोणत्या व्यवसायासाठी परवानगी घेतली व प्रत्यक्षात तेथे कोणता व्यवसाय चालतो, याविषयी खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष भेट देवून शहानिशा करण्यासाठी मोहिम आखली. गुरुवारी (दि. 8) रोजी औद्यागिक वसाहतीत सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य विलास काठे आदींसह कर्मचारी गेले असता जानोरी – दहावा मैल रोडलगत मिळकत नं. 1289च्या आशापुरा गोडाऊनमधील गाळा नं. 30 मध्ये तंबाखूजन्य अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले. या साठ्याबाबत विचारणा केली असता गाळ्यातील दोन कामगारांनी तेथून पळ काढला. यात काहीतरी चुकीचा प्रकार होत असल्याचे संशय आल्याने उपसरपंच हर्षल काठे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे यांना दूरध्वनीद्वारे यांसदर्भात माहिती दिली.

यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोंलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, धुमाळ, कावळे आदी पोलिस कर्मचारी संबधित स्थळी तत्काळ दाखल झाले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे गिरीष बागुल, किशोर खराटे, बापू पारखे, दिपक आहिरे आदींनीही भेट दिली. यावेळी संबंधित गाळा मालकाला बोलावून त्याच्याकडून गाळ्यांमध्ये विक्रीसाठी साठविलेला सुमारे 19 लाख 46 हजार 400 रुपये किमतीचा पानमसाला जप्त करण्यात आला.

याप्रकरणी शनी हनुमान गुप्ता (रा. व्हिलेज कयामुद्दीनपुर, पो. छापर सुलतानापूर, उत्तरप्रदेश) तसेच प्रदिप शर्मा (रा. मुंबई) या आरोपींवर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, धुमाळ, कावळे आदी पोलिस कर्मचारी करीत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version