Site icon

नाशिकमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीवर राहणार श्वानपथकांचा वॉच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. शहरालगत व पर्यटन स्थळावरील फार्महाऊसवर अनेकांनी पार्टीचे नियोजन केल्याने त्या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिस सतर्क झाले आहे. अमली पदार्थांचा साठा शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी श्वानपथकाचा वापर सुरू केला असून, संबंधितांवर ग्रामीण पोलिस कारवाई करणार आहेत.

मद्यपी व पार्टी करणाऱ्यांसाठी थर्टी फर्स्ट हे निमित्त असते. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे नियोजन केले जाते. काही पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.३०) व शनिवारी (दि.३१) नाकाबंदी केली जाणार आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने दोन वर्षांनंतर नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जल्लोषाचे बेत आखले असून, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्महाऊसचे बुकिंग केले आहे. पार्टीदरम्यान, गैरप्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात ४० पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. मद्यसेवन करून वाहने चालवू नये. जे मद्यपी वाहने चालवतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. अतिवेगाने वाहने चालविणार्‍यांवर स्पीड गनमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.३०) व शनिवारी (दि.३१) व्यापक तपासणी केली जाणार आहे. तसेच, गुरुवारी (दि.२९) रात्रीपासून जिल्ह्यात पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी सुरू आहे. जिल्ह्यातील ४० पोलिस ठाणे हद्दीत गैरप्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

टवाळखोरांवर कडक कारवाई

जिल्ह्यात २९ डिसेंबरपासून पोलिस बंदोबस्त कार्यान्वित झाला आहे. रात्री ८ वाजेपासून प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांसह टवाळखोर व हुल्लडबाजी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना, व्यवस्थापना, मॉल्स, दुकाने, उपहारगृहांमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीवर राहणार श्वानपथकांचा वॉच appeared first on पुढारी.

Exit mobile version