नाशिक : चार तासांच्या थरारानंतर तडीपार गुंडाला अटक

सुळकूडच्या स्टील व्यापारी पिता-पुत्राला जालन्यात अटक

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार असताना गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंडाला सुमारे चार तासाच्या थरारानंतर वावी पोलिसांनी नाशिक व सिन्नर येथून अधिक कुमक बोलवून जेरबंद केले.

पोलिसांनी बळाचा वापर करी0त त्याच्या घराचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले. भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर असे त्याचे नाव आहे. सोमवारी (दि. 31) सायंकाळी पोलिसांनी त्याच्या शहा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. तडीपार असताना देखील भैय्या हा सिन्नर तालुक्यात येऊन गुन्हेगारी कारवाया करत असल्याची माहिती वावी पोलीसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली वावी पोलिसांचे पथक शहा येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. भैय्या कांदळकर याला घरातून ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर कुटुंबियांनी सुमारे चार तास प्रतिकार केल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली.

तडीपार असतांना रविवारी रात्री भैय्या कांदळकर याने बेकायदेशीररित्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊन शहा येथे वाहनाची तोडफोड केली होती तसेच गोंधळ घातला होता. भैय्या शहा येथील राहत्या घरी असल्याची खबर मिळाल्यानंतर व्हावी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी पथकासोबत शहा येथील भैय्याचे घर गाठले. मात्र पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने खोलीत दडून बसला होता.

त्याचे वडील आई आणि पत्नी यांनी पोलिसांना घरात येऊ देण्यास प्रचंड विरोध केला. सहाय्यक निरीक्षक लोखंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व वाढीव कुमक मागितली. त्यानुसार नाशिक येथून दंगा नियंत्रक पथकाची एक सशस्त्र तुकडी व सिन्नर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक शहा येथे सायंकाळपर्यंत दाखल झाले. तोपर्यंत पोलिसांनी भैय्या याच्या घराला वेडा घालत त्याला घराबाहेर पडण्यास व पळून जाण्यास प्रतिबंध केला होता. वाढीव कुमक आल्यानंतर देखील त्याच्या आई-वडिलांकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यात येत होती. त्यांनी घराच्या पुढच्या बाजूचे दरवाजास लोखंडी सळया लावल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी पाठीमागच्या बाजूचा लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कुटुंबियांकडून कुऱ्हाड व कोयता ताब्यात घेतला. दरम्यान भैय्याच्या आईने घरातील गॅस सिलिंडरची नळी काढून घर स्फोटाने उडवून देण्याची धमकी दिल्याचे पोलीसांनी सांगितले. भैय्या कांदळकर यास रात्री आठ वाजेच्या सुमारास वावी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कांदळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पत्नीने कापली हाताची नस; आईने घर उडवून देण्याची दिली धमकी

वावी पोलीस भैय्या उर्फ प्रवीण कांदळकर याला ताब्यात घेण्यासाठी शहा येथे गेले. त्यादरम्यान त्याचे वडील, आई व पत्नी यांनी पोलिसांना शिवीगाळ करीत कामात अडथळा आणल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी सांगितले. पत्नीने हाताची नस कापून घेतली. पोलिसांनी आई व पत्नीला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तर भैय्यासह वडिलांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

The post नाशिक : चार तासांच्या थरारानंतर तडीपार गुंडाला अटक appeared first on पुढारी.