दोन लाखांवरील कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा; शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन
सायगाव (जि. नाशिक) : थकबाकीदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दोन लाखापर्यंत कर्जमाफी देऊन सहा महिने झाले. पण, अद्यापही दोन लाखावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याने या शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिल्यानंतर तिचा मोठा लाभ होऊन अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. पण, अनेक वर्षापासून कर्जाने ग्रासलेल्या दोन लाखावरील थोडेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. शासनाने दोन लाखावरील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले पण, अद्यापही कार्यवाही होत नसल्याने इतर पैसे मिळविण्याचे स्त्रोत बंद झाल्याने या शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढून शेतीसाठी वापरावे लागत आहे. यंदा जास्त पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता हातात काहीच राहिले नसल्याने मोठ्या विवंचनेत हे शेतकरी सापडले आहे. त्यामुळे दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करुन कर्जमुक्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवक आवाडीचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ई - मेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
कधी दुष्काळ तर कधी अवकाळीमुळे शेतकरी अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहे. दोन लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. पण, दोन लाखांवरील कर्ज असणारे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. त्यांचे मोठे हाल होत आहे. तरी शासनाने त्यांना त्वरित कर्जमाफी देऊन कर्जमुक्त करावे.
- सुनील देशमुख, माजी सरपंच, सायगाव
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच