Site icon

नाशिक : पारंपरिक नृत्याने आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ढोल, घुंगरू, शहनाई, हलगी, उफडे, सांज, बासरी, सैनी, पोंगा या पारंपरिक वाद्यांसह विविध वन्यप्राण्याची वेशभूषा, पारंपरिक नृत्यावर थिरकणारे आदिवासी बांधव आणि प्रत्यके नृत्य सादरीकरणाला टाळ्या वाजून प्रेक्षकांकडून मिळणारी दाद,अशा उत्साहवर्धक वातावरणाने राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत वाढविली. राज्यभरातील सुमारे 15 आदिवासी समाजाच्या कलापथकांनी बुधवारी (दि.16) एकापेक्षा एक सरस नृत्यअविष्कार सादर केले.

आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक वारशाचा दर्शन घडत आहे. तळोदा व यावल प्रकल्पाच्या होळी नृत्य, चंद्रपूर प्रकल्पाच्या गोंडी ठेयसा नृत्य, वर्ध प्रकल्पाच्या मोरनाचे, नागपूर अपर आयुक्तालयाच्या जय गोंडवाना व रेला मांदरी नृत्य प्रकाराला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

धारणी प्रकल्पाच्या गदुली-सुसून नृत्य, बोरगावच्या महिलांनी ढेमसा नृत्य, अकोला प्रकल्पाच्या दंडारी नृत्य, पालघरच्या ढोलनृत्य, भामरागड प्रकल्पाच्या रेला पाटा नृत्य, पुसद प्रकल्पच्या भिल्ल नृत्य, यवतमाळच्या दंडार नृत्य, भंडारा प्रकल्पाच्या गोंडी शैला नृत्य, किनवट प्रकल्पाच्या गोंडी ढेमसा नृत्य, मुंबईच्या ढोलनाच, कळमनुरीच्या दिंडारन नृत्य हे डोळ्याचे पारणे फेरणारे ठरले. दरम्यान, नृत्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपायुक्त हंसध्वज सोनवणे, विनित पवार, दशरथ पानमंद, एकलव्य निवासी स्कूलचे प्राचार्य सुरेश देवरे यांनी काम बघितले.

स्टॉलला प्रतिसाद
महाराष्ट्रातील आदिवासी सांस्कृतिक मुल्यांची आवड असणार्‍या नागरिकांसाठी पारंपरिक पध्दतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गोंडी चित्रकला, गवताच्या वस्तू, बांबूकाम, काष्टशिल्पे, धातूकाम, मातीकाम, पारंपारिक वनौषधी, लाकडी व लगद्याचे मुखवटे आदीचे भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहे. या स्टॉलवर खरेदीलाही नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पारंपरिक नृत्याने आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत appeared first on पुढारी.

Exit mobile version