Site icon

नाशिक : भारतीय स्टेट बँकेतील चोरीची उकल; 14 लाख रुपये हस्तगत

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
पेठ नाका येथील स्टेट बँकेतून 15 दिवसांपूर्वी काही संशयितांनी कॅश काउंटरवर जमा असलेल्या रकमेपैकी 17 लाख रुपयांची रोकड हातोहात चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू असताना हे संशयित मध्य प्रदेशामधील असल्याचे निष्पन्न झाले. पंचवटी पोलिस तपास पथक चोरट्यांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशामध्ये पोहोचले. चोरीला गेलेल्या 17 लाखांपैकी 14 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी एकाही संशयिताला ताब्यात घेतलेले नाही.

2 नोव्हेंबर रोजी पेठ नाका येथील भारतीय स्टेट बँकेत दुपारी 1 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास बँक कॅशियर राजेंद्र बोडके यांनी कॅश काउंटरवर काही रुपयांची रक्कम जमा केली होती. या सुमारास संशयित ऋषी अनुपसिंग छायल याने बोडके यांच्या काउंटरवरून 17 लाख रुपयांची रोकड हातोहात लंपास केली होती. त्यानंतर बँकेत दुसरीकडे उभा असलेला त्याचा साथीदार करण पप्पू सासी व बँकेच्या बाहेर टेहळणी करीत उभा असलेला नरपतसिंग नाथूलाल दफाणी (तिघेही रा. कडियासासी, ता. पचौर, मध्य प्रदेश) हे तिघे जण फरार झाले. काही वेळाने बँकेत जबरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंचवटी पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना संशयित हे मध्य प्रदेशामधील असल्याचे समोर आले. तपासी पथक थेट मध्य प्रदेशामध्ये संशयितांच्या गावी पोहोचले. पण संशयित फरार असल्याने संशयितांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना बँकेतून चोरलेल्या 17 लाख रुपयांपैकी 14 लाख रुपये हस्तगत करण्यात यश आले. याबाबत गुरुवारी (दि. 17) पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या तपासाची माहिती दिली. दरम्यान, या घटनेतील फरार संशयित पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच त्यांना जेरबंद केले जाणार असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.

यांनी बजाविली कामगिरी :

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस उपआयुक्त किरण चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, अशोक काकड, सागर कुलकर्णी, अनिल गुंबाडे, कुणाल पचलोरे, राहुल लभडे, कल्पेश जाधव, अंकुश काळे आदींनी ही कामगिरी बजाविली.

कडक सुरक्षा असूनही चोरी झाल्याने आश्चर्य
भारतीय स्टेट बँकेत एवढी मोठी व कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही रक्कम चोरीला जाते कशी, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यावरून स्थानिक गुन्हेगारांचाही यात समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्य प्रदेशामधील हे तिघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, आजूबाजूच्या राज्यांमध्ये बँकेची टेहळणी करून रक्कम चोरणे, बँकेतून रक्कम काढणार्‍या नागरिकांकडून रक्कम चोरणे, यासह लग्न समारंभात लहान मुलांच्या मदतीने सोन्याचे दागिने चोरणे, बॅग लिफ्टिंग करणे अशा प्रकारे चोरी करण्यात हे संशयित तरबेज आहेत. संशयित राहात असलेल्या गावात सर्व जण अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने गुन्हेगारांना अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर हे नागरिक हल्ला करीत असल्याचे यावेळी पोलिस उपआयुक्त चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : भारतीय स्टेट बँकेतील चोरीची उकल; 14 लाख रुपये हस्तगत appeared first on पुढारी.

Exit mobile version