Site icon

नाशिक : विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा 

निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे विहिरीच्या पाण्यात शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ च्या सुमारास घडली. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील शेतकरी मनोज भगीरथ जगझाप यांचे पाकीट, मोबाइल, चप्पल आणि मोटारसायकल त्यांच्याच शेतातील विहिरीजवळ आढळून आली होती. मात्र, ते शेतात कुठेही दिसत नसल्याने नातेवाइकांना शंका आली. त्यांनी तातडीने पिंपळगाव पोलिस ठाण्यात संपर्क केला असता घटनास्थळी अग्निशामक विभागाचे प्रमुख अभिजित काशीद हे जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. गळाच्या साह्याने विहिरीच्या पाण्यात मृतदेह शोधू लागले. मृताच्या पोटाला भला मोठा दगड बांधलेला असल्याने मृतदेह गळाला लागत नव्हता, त्यात बघ्यांची गर्दी असल्यामुळे मोठी अडचण अग्निशमन जवानांना येत होती. शेवटी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक जवानांना यश आले आणि त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. पिंपळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज बोराळे करत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह appeared first on पुढारी.

Exit mobile version