Site icon

आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- शहर परिसरासह ग्रामीण भागाला बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदारपणे झोडपून काढले. वादळी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गाराही पडल्याने मका, कांदा भिजून खराब झाला आहे, तर काढणीवर आलेला गहू, कांदा, हरभरा यासह रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला.

गेल्या वर्षी अतिवृष्टी, यावर्षी दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नसताना सोमवारी रात्री अवकाळी आणि गारपीटच्या रूपाने त्याच्यावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले. त्यानंतर मंगळवार आणि बुधवार असे सलग तीन दिवस शहर परिसरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने गारपीठीसह जोरदार हजेरी लावली. या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, हरभरा, रब्बीच्या पिकांसोबत आंबा मोहरालाही फटका बसला आहे. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. वादळामुळे गव्हाचे उभे पिक आडवे झाले तर अनेक शेतकऱ्यांनी नुकताच कांदा काढून खळ्यावर ठेवलेला होता तो भिजून खराब झाला. काढणीला आलेल्या हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

विवाह सोहळ्यात विघ्न

आज शहरात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होते. पावसामुळे वऱ्हाडी मंडळीला जेवण अर्धवट सोडून ताटांवरुण उठण्याची वेळ आली. गत तीन दिवसांपासून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे वधू, वरासह वऱ्हाडी मंडळीची तारांबळ उडत आहे.

तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याची सूचना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवकाळी पावसाची माहिती देऊन मदत देण्याची मागणी केली आहे. -सुहास कांदे ,शिवसेना आमदार

हेही वाचा :

The post आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Exit mobile version