Site icon

उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा 

नंदुरबार/ जळगाव/नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुजरातमध्ये अहमदाबाद भागात पहाटे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते सकाळी अकराच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार-जळगाव भागात केंद्रित झाल्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याला सकाळी अकरापासून तासभर अनेक ठिकाणी जोरदार मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला.

चक्रीवादळ आणि पावसाचा सर्वाधिक तडाखा नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला बसला. या दोन जिल्ह्यांत असंख्य ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब पडले आणि वाहतूकही ठप्प झाली तसेच केळीच्या बागाही जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू उभे राहिले. या दोन जिल्ह्यांत अनेक ठिकाणी घराचे पत्रे, कौलारू घरे जमीनदोस्त झाले. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परंतु मनमाड शहराने तासभर धुळीच्या वादळाचा तडाखा अनुभवताना तेथील नागरिक अक्षरश: भयभीत झाले होते.

मान्सूनपूर्व वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात वीज पडून शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला, तर नंदुरबार जिल्ह्यात झाड कारवर कोसळल्याने तरुण कारचालकाचा चिरडून मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात सायंकाळपर्यंत कोठेही प्राणहानीचे वृत्त नव्हते. परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हरसूल येथील महादू पवार, परशराम पवार या दोन आदिवासींच्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, सापुतारा या पट्ट्याला विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने तासभर झोडपून काढले. वादळी पावसाने त्र्यंबकमध्ये जणू काही पूरस्थिती निर्माण झाली होती. तेथे भाविकांचे प्रचंड हाल झाले. वणी, दिंडोरी आणि गडावरही जोरदार पाऊस झाल्याने भाविकांची पळापळ झाली. सुट्टीनिमित्त सापुताऱ्यात असलेल्या हजारो पर्यटकांना विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. या पावसाने जांभूळ, करवंदाचे प्रचंड नुकसान झाले. त्र्यंबक, पेठ, सुरगाणा भागांत दहा मिमी पावसाची नोंद झाली.

मनमाडला वाऱ्याने उलटवली बस

मनमाड शहराने दीड तासभर धुळीच्या वादळाचे थैमान अनुभवले. धुळीमुळे दीड मीटर अंतरावरील दिसणेसुद्धा मुश्किल झाले होते. धुळीच्या वादळात तासभर मनमाड आणि आजूबाजूचा परिसर अक्षरश: गायब झाला होता. वादळाच्या तडाख्यात सापडून धुळे-पुणे बस उलटल्याची घटना मनमाडपासून जवळ पुणे-इंदूर महामार्गावर घडली. या अपघातात एसटीमधील 43 पैकी चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, उर्वरित प्रवाशांना किरकोळ मार लागला.

नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवाला तडाखा

नंदुरबार जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आणि नागरिकांच्या हृदयात अक्षरश: धडकी भरवली. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसाच्या तांडवासमोर सारेच हतबल झाले. नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, शहादा या तालुक्यांमध्ये विद्युत खांब आणि अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तळोदा तालुक्यातील तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे झाड कारवर कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रतातपूर (ता. तळोदा) येथील राजेंद्र रोहिदास मराठे (वय ४२) असे या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीस ते पंचवीस मिमी पावसाची नोंद झाली.

जळगावला केळीबागांची हानी

जळगाव जिल्ह्याला सकाळी अकरानंतर तासभर वादळी पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी केळीबागांचे नुकसान झाले. केळीची झाडेही आडवी झाल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांना अवघ्या वीस दिवसांनंतर नुकसानीला सामोरे जावे लागेल. जळगाव जिल्ह्यात दहा ते पंधरा मिमी पावसाची नोंद झाली. पारोळा तालुक्यात लिंबाच्या झाडाखाली थांबलेला शेतमजूर सुनील ठाकरे (वय ३२) हा तरुण शेतमजूर वीज अंगावर पडून ठार झाला.

वादळी पावसाचा अंदाज

भारतीय वेधशाळेने रविवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सोमवारी दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळी पाऊस आणि विजा पडण्याचा इशारा दिला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या भागात तीव्र उष्णतेमुळे गुजरात-उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा मंगळवारीही कायम राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे.

हेही वाचा :

The post उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा  appeared first on पुढारी.

Exit mobile version