Site icon

जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

जळगाव : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेनिमित्त आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे. धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. बॅनर फाडल्याने मध्यरात्रीनंतर तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले आहेत.

“शिव संवाद” यात्रा दौरा आज दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवासेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर जागोजागी लावले आहेत. मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. राजकीय व्देषातून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

हेही वाचा :

 

The post जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले appeared first on पुढारी.

Exit mobile version