Site icon

जाती पातीची भांडणे लावणाऱ्यांपासून सावध राहा : सुषमा अंधारे

सिन्नर (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा- देशात वाढती महागाई, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्यावरील लक्ष आगामी निवडणुकीतून विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षण, रामलल्लांची स्थापना हे मुद्दे आणले आहेत. जाती-पातीत वाद लावणाऱ्या, मराठा-ओबीसी यांच्यात तेढ निर्माण करणाऱ्या आणि हिंदू-मुस्लीम समाजात वाद लावणाऱ्यांपासून सावध रहा असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.

मातृतिर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद अभियानांतर्गत उबाठा गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे वावी येथे आगमन झाल्यानंतर त्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला. वावी ग्रामस्थांची गा -हाणे समजून घेतांना त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशात व महाराष्ट्रात महिला सुरक्षीत राहिल्या नसल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.

व्यासपीठावर उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाढे, किरण कोथमिरे, उपतालुकाप्रमुख दीपक वेलजाळी, विठ्ठल राजेभोसले, सोपान घेगडमल, दीपक वेलजाळी, महिला तालुकाध्यक्ष मनिषा घेगडमल, सविता घेगडमल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आता मन की बात नाही तर जन की बात ऐकण्यासाठी आपण संवाद यात्रा सुरु केल्याचे अंधारे यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांची मुजोरी वाढली असून पोलीस महिलांच्या तक्रारी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गृहमंत्र्यांची पत्नी ज्या राज्यात सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्य महिलांची काय परिस्थिती असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे दृष्टचक्र सत्ताधाऱ्यांनी सुरु केले आहे. लोकप्रिय घोषणा करणाऱ्या सरकारकडे कोणतेही धोरणात्मक निर्णय नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला. आनंदाच्या शिध्यावर त्यांनी घणाघाती टीकास्त्र सोडले. पौष महिन्यात कोणतेही चांगले काम केले जात नसतांना भाजपाने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रामलल्लांची स्थापना केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. भाजपा हुकूमशाहीला जन्म देत असल्याच्याही त्या म्हणाल्या. आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद लावण्याचा फंडा भाजपानेच आणल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी विजय करंजकर, विठ्ठल राजेभोसले, मनिषा घेगडमल, संतोष जोशी, गणेश वेलजाळी यांनी मनोगत व्यक्त केले. 

हेही वाचा :

The post जाती पातीची भांडणे लावणाऱ्यांपासून सावध राहा : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Exit mobile version