Site icon

ड्रोनमुळे हाती लागला दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह

नंदुरबार – अस्तंबा यात्रेत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह ८० फूट खोलदरीत आढळला. विशेष असे की, ड्रोन मुळे खोल दरीतून हा मृतदेह शोधण्याला उशिरा म्हणजे 17 नोव्हेंबर 2023 रोजी यश आले.

जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात अस्तंबा म्हणजेच अश्वत्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत चार हजार फूट उंचीवर असलेले ठिकाण मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाभारतातील चिरंजीव अश्वत्थाम्याचे हे स्थान असल्याचे मानले जाते. अस्तंबा ऋषींच्या डोंगरावर जाण्याचा रस्ता कधी खोल दरी, पाय थोडाही घसरला तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही, असा खडतर आहे. अर्थात याही परिस्थितीत हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने अश्व त्थाम्याच्या दर्शनाला येत असतात. ऐन दिवाळीत धनत्रयोदशी ते भाऊबीज यादरम्यान ही यात्रा असते. नंदुरबार जिह्यातील अक्राणी (धडगाव) तालुक्यात असलेला श्री अस्तंबा (अश्वत्थामा) ऋषी डोंगर म्हणजे शूलपाणी झाडीमधील एक उंच शिखर आहे. या दिवाळीतही हजारोंच्या संख्येने भाविक अस्तंबा शिखरावर गेले होते.

म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी सचिन ब्रिजलाल पावरा (26) हा देखील या यात्रेत गेला होता. परंतु परत न आल्याने बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, त्याच्या नातलगांनी ड्रोन ची मदत मागवून शोध घेतला. अखेरीस ड्रोन मुळे खोल दरीतून मृतदेह शोधण्याला काल रात्री उशिरा म्हणजे 17 नोव्हेंबर 2023 रोजी यश आले.  अस्तंबा वाटेवर नकट्यादेव नावाचा खडतर घाट रस्ता व शिखर आहे. त्या वाटेवर चालताना त्याचा तोल गेला आणि तो 80 फूट खोल दरीत जाऊन कोसळला; असा कयास लावला जात आहे. तळोदा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post ड्रोनमुळे हाती लागला दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Exit mobile version