Site icon

दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक

मालेगाव : नीलेश शिंपी- धुळे लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी दाभाडी येथील श्री लॉन्स येथे मंगळवारी (दि.16) चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दाभाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी या बैठकीला विरोध केल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन त्यानंा धक्काबुक्की करण्यात आली. Dhule Lok Sabha Elections

धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. भामरे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने नाशिक स्थित डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या उमेदवारीमुळे मालेगाव-धुळे विभागात नाराजी आहे. त्यातूनच नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामे दिले. भाजपाचे उमेदवार डॉ. भामरे व काँग्रेसच्या उमेदवार डॉ. बच्छाव यांच्या उमेदवारीला मालेगाव व धुळ्यातून विरोध होत आहे. यात उमेदवारी जाहीर झालेल्या दोघा उमेदवारापैकी डॉ. भामरे यांच्यावर निष्क्रीयतेचा आरोप करण्यात आला आहे. तर डॉ. शोभा बच्छाव यांच्यावर मतदार संघाबाहेरील उमेदवार असा आरोप करून नवीन उमेदवाराची चाचणी सुरु आहे. त्या पार्श्‍वभुमीवर माजी आमदार गोटे यांच्या पुढाकारातून परिवर्तन मंचतर्फे धुळे लोकसभेसाठी सर्व समावेशक तिसर्‍या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी करण्यासंदर्भात चिंतन बैठकीचे दाभाडीत आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या मात्र उमेदवारी न मिळालेल्या काँग्रेस व भाजप इच्छूक उमेदवारांच्या समर्थकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या बैठकीस माजी आमदार गोटे यांच्यासह धुळ्याचे शाम सनेर, डॉ. विलास बच्छाव, टेंभे येथील भाऊसाहेब आहेर आदींसह नेते उपस्थित होते. यावेळी डॉ. बच्छाव व सनेर यांनी मार्गदर्शन केले. अहिरे हे भाषण करत असतानाच दाभाडी येथील भाजप युवा कार्यकर्ते कमलेश निकम हे तेथे आल्यानंतर त्यांनी ही बैठक का घेतली. दाभाडीचे कोणी आहे का असे विचारत व्यासपिठावर जाऊन बैठकीचा फलक काढून फेकला. त्यानंतर बैठकीला उपस्थित असणारे व निकम यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. याप्रकरणी कोणी ही तक्रार दिली नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. Dhule Lok Sabha Elections

ही पहिलीच बैठक आहे. यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघात बैठक घेण्यात येतील. त्यानंतर सर्व पक्षातील नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन सर्वमान्य उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल असे पत्रक चिंतन मंचचे नेते प्रशांत भदाणे व विजय वाघ यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

दाभाडी येथे आमची सामाजिक बैठक होती. गोटे यांच्या मेळाव्यात काय गोंधळ झाला याची कल्पना नाही. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. भाजप सोबत आहोत. तेथील गोंधळशी आमचा काहीही संबंध नाही. – दीपक पवार

हेही वाचा –

The post दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक appeared first on पुढारी.

Exit mobile version