Site icon

नाशिककरांकडून नवर्षाचे जल्लोषात स्वागत 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शनिवार, रविवारची सलग सुटी आणि नववर्षाचे स्वागत असे निमित्त करून नाशिक शहरासह जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते. त्यानुसार नाशिककरांनी आनंद साजरा करण्यासाठी सहकुटुंब, मित्रपरिवारासह पार्टीचे नियोजन केले.

रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत शहरासह जिल्ह्यात आनंदाचा जल्लोष होता. या आनंदाला गालबोट लागू नये यासाठी शहर, ग्रामीण पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाकाबंदी, तपासणी मोहीम, बंदोबस्त केला होता. त्यामुळे तळीरामांसह मद्यपी चालकांवर अंकुश ठेवता आल्याचे चित्र होते. नाशिककरांनी रात्री १२ वाजता जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. त्या आधी हॉटेल, फार्महाउस, रिसॉर्ट, बार नागरिकांनी गजबजले होते. त्याचप्रमाणे अनेकांनी प्रार्थनास्थळांमध्ये जात नववर्षानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. शहरातील अनेक रस्ते गर्दीने फुलले होते. अनेकांनी गच्चीवर एकत्र येत छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आनंद लुटला. तर काही नागरिकांनी बाहेरगावी जाण्याचा बेत आखल्याने महामार्गांवर वाहनांची संख्या वाढल्याचे दिसले तर बसस्थानक व रेल्वेस्थानकांवरही गर्दी पाहावयास मिळाली. नागरिकांच्या आनंदास गालबोट लागू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करीत बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

नाशिक शहरासह जिल्ह्यात पहाटेपर्यंत हजारो वाहनांची तपासणी केली. त्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या १५० चालकांना दंड ठोठावला. तर परिक्षेत्रात ९४ तळीरामांना ताब्यात घेतले. रात्री ८ पासून मद्यपींची धरपकड करून थेट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणीअंती संशयितांना ताब्यात घेत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. रविवारची सुटी व नववर्ष स्वागताचे निमित्त असल्याने सकाळपासूनच वाइन शॉपवर गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी वाइन शॉप व बार परिसरात दिवसभर गस्त सुरू ठेवली. रात्री ८ नंतर या भागात पोलिस बंदोबस्तही होता. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आस्थापना वेळेत बंद करण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून सूचना करण्यात आल्या. मद्यपी व रस्त्यावर फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवला. वाहनचालकांच्या तपासणीसाठी शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी सुरू होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पार्टीसाठी ४० परवाने दिले आहेत. तर मद्यसेवन परवानेदेखील हजारो दिले आहेत. जिल्ह्यातील फार्महाउस, रिसॉर्ट, हॉटेलची तपासणी केली. टवाळखोरी करणाऱ्यांना दामिनी मार्शल व पोलिसांनी दणका दिला. भरधाव वाहने चालवणाऱ्यांना पकडून कारवाई केली. मद्यपी चालक तपासणीवर सर्वाधिक भर दिला.

The post नाशिककरांकडून नवर्षाचे जल्लोषात स्वागत  appeared first on पुढारी.

Exit mobile version