Site icon

नाशिकचा पारा वाढला, वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एप्रिलच्या मध्यात नाशिकचा पारा वाढला असून, वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक घामाघूम होत आहेत. शहरात शुक्रवारी (दि.१२) कमाल तापमानाचा पारा ३८.१ अंशांवर पोहोचला होता.

राज्यावर एकीकडे अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे. गेल्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांवर स्थिरावला आहे. त्यातच नाशिकमध्ये शुक्रवारी किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, थेट २३.४ अंश सेल्सियसवर पारा पोहोचला. त्यामुळे हवेतील उकाडा तीव्र स्वरूपात जाणवत आहे. दिवसभर उन्हाच्या झळा लागत असल्याने नाशिककरांपुढे घरात किंवा कार्यालयामध्ये एसी, फॅन, कूलरची हवा घेण्याशिवाय पर्याय नाही. दुपारी १२ ते ४ यावेळेत सर्वाधिक उन्हाचा चटका बसत असल्याने या काळात शहरातील रस्ते सामसूम पडतात.

जिल्ह्याचा ग्रामीण भागही उन्हाच्या झळांनी पोळून निघत आहे. आताच ठिकठिकाणी पारा ३५ अंशांवर पोहोचल्याने ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा तीव्र परिणाम होत आहे. बळीराजाकडून शेतीची कामे पहाटेच्या वेळी किंवा सायं. ४ नंतर उरकण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, उत्तर व मध्य भारताकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांच्या झोतामुळे येत्या काळात उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा –

The post नाशिकचा पारा वाढला, वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम appeared first on पुढारी.

Exit mobile version