Site icon

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात किरकोळ कारणांवरून एकमेकांवर प्राणघातक हल्ले करणे, हाणामारी करणे, दहशत करण्यासारखे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारांकडून धारदार शस्त्रे, बंदुकींचा सर्रास वापर होत आहे. या घटनांमुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि.२७) पोलिस आयुक्तालयातील ११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणांमुळे बदली झाल्याचे सांगितले जात असले तरी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांची पंचवटी पोलिस ठाण्यात, पंचवटीचे निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची सायबर, सायबरचे निरीक्षक सूरज बिजली यांची अंबड पोलिस ठाण्यात, अंबडचे निरीक्षक युवराज पतकी यांची मुंबई नाका, इंदिरानगरचे संजय बांबळे यांची विशेष शाखेत, अभियोग कक्षाचे निरीक्षक पवन चौधरी यांची नाशिकरोड पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकरोडचे दुय्यम निरीक्षक गणेश न्याहदे यांच्याकडे इंदिरानगर पोलिस ठाण्याची सूत्रे देण्यात आली आहेत. यासह आर्थिक गुन्हे शाखेतील दुय्यम निरीक्षक अशोक शरमाळे यांसह नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांना चुंचाळे पोलिस चौकीत नियुक्त केले आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

सातपूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र, गोळीबाराच्या घटनेमुळे तपासकामी चव्हाण यांना तातडीने सातपूर निरीक्षकपदी पुन्हा नियुक्त करण्यात आले. मात्र, चव्हाण यांच्याकडील प्रभारी पदाची जबाबदारी पुन्हा काढून घेण्यात आली आहे. उपनगरचे दुय्यम निरीक्षक पंकज भालेराव यांना आता सातपूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Exit mobile version