Site icon

नाशिकमध्ये रस्ता डांबरीकरण कामांना वेग, ठेकेदारांना आयुक्तांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने डांबर, खडी टाकून खड्डे बुजवले जात आहेत. नाशिकरोड, पाथर्डी भागात डांबर टाकून रस्ते दुरुस्त करण्यात आले असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली जात आहे.

रस्त्याची दुरुस्ती करताना त्यांच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्याची सक्त ताकीद कंत्राटदारांना देण्यात आली आहे. सहा विभागांतील एकूण 14 ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची सूचना केली आहे. नाशिक पश्चिम विभागातील थत्तेनगर परिसरात खड्डे बुजविण्यात आले. याच विभागातील बारा बंगला रोड येथे पाणीपुरवठा लाइन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता खडीकरणाद्वारे बुजविण्यात येत आहे.

पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये कलानगर, वडाळा, पाथर्डी रोड इथे खड्डे बुजविण्यात आले. कलानगर चौकात एसी मटेरियलने खड्डे बुजवण्यात येत आहेत. प्रभाग क्रमांक 31 मध्ये मेट्रो झोन इथेही खड्डे बुजवण्यात आले. त्याशिवाय सातपूर प्रभाग क्रमांक 8 मध्ये गंगापूर रोड येथील खड्डे बुजवले जात आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये गणेशनगर, प्रभाग क्रमांक 7 वसंत मार्केट, गोल्ड जिमजवळ पेव्हरब्लॉकने खड्डे बुजविले जात आहेत. नांदूर रोडला प्रभाग क्रमांक 31 मध्ये खड्डे बुजवण्यात आले आहेत. नाशिकरोड विभागात आर्टिलरी सेंटर रोड इथे एमएनजीएलने गॅस पाइपलाइनसाठी केलेली खोदाई डांबर, खडीचा वापर करून बुजवण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये रस्ता डांबरीकरण कामांना वेग, ठेकेदारांना आयुक्तांचे निर्देश appeared first on पुढारी.

Exit mobile version