Site icon

नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शासनाच्या महाराष्ट्र राज्य फायर सर्व्हिसेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून ९० मीटर एरिअल लॅडर प्लॅटफाॅर्म अर्थात हायड्राेलिक शिडी खरेदीचा घातलेला घाट चांगलाच फसल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने, याबाबतची फाइल मंत्रालयात पाठविण्यात आली होती. मात्र, ही फाइल लालफितीत अडकल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाने दिली आहे.

नाशिक शहर व परिसरात मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत असून, या इमारतींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तेवढ्या उंचीची शिडी अग्निशमन विभागाकडे असावी यासाठी ९० मीटरची हायड्राेलिक शिडी खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी अग्निशमन विभागाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार मनपाने फायरस्केप या संस्थेला पात्र ठरविले होते. वेमा या इटालियन कंपनीची शिडी खरेदी करण्यात येणार होती. मात्र, निविदा प्रक्रियेत तरतूद करण्यात आलेल्या अटी-शर्तीनुसार शिडी खरेदी करण्यात येत नसल्याची तक्रार डॉ. पुलकुंडवार यांच्याकडे केली गेल्याने शिडी खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने अटी-शर्तीप्रमाणे हायड्रोलिक शिडीचे वाहन खरेदी करताना त्यात अनेक बदल परस्पर केल्याची गंभीर बाब समोर आली होती.

डॉ. पुलकुंडवार यांनी जेव्हा याबाबतची माहिती घेतली तेव्हा अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर आल्या होत्या. त्यामध्ये हायड्रोलिक शिडी वाहन बनविण्याच्या अनुभवाचे दाखले नसणे. कंपनीचे कुशल मनुष्यबळ तसेच स्पेअर पार्टदेखील भारतात उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. तर ब्रोटो स्कायलिप्ट ही अग्निशमन बचावाच्या दृष्टीने ९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफाॅर्मची एकमेव कंपनी असून मुंबई, ठाण्यासह भारतात विविध ठिकाणी कंपनीचे युनिट्स आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मुंबई, ठाणे, मीरा-भाइंदर येथील मागील निविदांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचे पुनरावलोकन केल्यास हीच कंपनी ९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्मसाठी योग्य असल्याचेही त्यावेळी समोर आले होते. मात्र, अशातही अग्निशमन विभागाने या कंपनीचा विचार न करता तांत्रिक वैशिष्ट्ये नसलेल्या आणि अशा प्रकारच्या शिडीचे उत्पादन भारतात न करणाऱ्या विशिष्ट कंपनीला नजरेसमोर ठेवून निविदा प्रक्रियेत सामावून घेण्याचा घाट घातल्याचे समोर आले होते.

शिडी खरेदीला ग्रीन सिग्नल कधी मिळणार?

शहराची गरज लक्षात घेता ९० मीटर हायड्रोलिक शिडी गरजेची असल्याने, याबाबतची फाइल मंत्रालयात सादर करण्यात आली होती. मात्र, अग्निशमन विभागाच्या यापूर्वीच्या संशयास्पद निविदा प्रक्रियेमुळे ही फाइल लालफितीत अडकली आहे. त्यामुळे शिडी खरेदीला केव्हा ग्रीन सिग्नल मिळणार का हा प्रश्न आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : 'अग्निशमन'च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत appeared first on पुढारी.

Exit mobile version