Site icon

नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-नाशिक दरम्यानच्या रेल्वे प्रवासात वेळ खाणार्‍या इगतपुरी-कसारादरम्यानच्या रेल्वेमार्गावर 1:100 ग्रेडियंट क्षमतेचा बोगदा व्हावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली. तसेच या कामासाठी 64 लाखांचा निधी मंजूर केला आहे.

इगतपुरी-कसारा हे अंतर 16 किमीचे आहे. या मार्गावरील डोंगरात 1: 100 ग्रेडियंटचा बोगदा झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि बॅकरवर होणारा खर्चही वाचणार आहे. यासाठी गोडसे सातत्याने पाठपुरावा करत होते. मध्य रेल्वेमार्गावरून मुंबईकडे ये-जा करणार्‍या रेल्वेगाड्यांची संख्या मोठी आहे. घाट परिसरात पूर्वीचे जुने बोगदे हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वेगाड्यांना दोन्ही बाजूने इंजिन लावण्याची गरज असते. परिणामी इगतपुरी-कसारादरम्यान घाट परिसरात सतत रेल्वेगाड्या थांबवाव्या लागत असल्याने प्रवासाचा वेळ वाढतो. यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरीदरम्यान 1ः37 ऐवजी 1ः100 ग्रेडियंट क्षमतेचा बोगदा व्हावा, अशी मागणी गोडसे केंद्राकडे करत होते. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने ग्रेडियंट बोगद्याच्या सर्वेक्षणाच्या प्रस्तावास या आधी तात्पुरती मान्यता दिली होती. परंतु, रेल्वेबोर्डाच्या अंतिम मान्यतेमुळे लवकरच या जादा व्यासाच्या बोगद्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे घाट परिसरात अधिक व्यासाच्या बोगद्याची निर्मिती होणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना घाट परिसरात सतत थांबावे लागणार नसून गाड्यांना बॅकर इंजिनही लावण्याची गरज पडणार नाही.

.. तर कसारा लोकल नाशिकपर्यंत
जास्त व्यासांच्या बोगद्याची उभारणी झाल्यावर मुंबईहून कसार्‍यापर्यंत धावणारी लोकल नाशिकपर्यंत आणणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. याबरोबरच इगतपुरी – कसारादरम्यान चौथा व पाचवा रेल्वेमार्ग वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार appeared first on पुढारी.

Exit mobile version