Site icon

नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्र्यांच्या अल्टीमेटमनंतर खड्डे बुजविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर ॲक्शन मोडवर आले आहेत. बांधकाम विभागाने खड्ड्यांचे विभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, उपअभियंत्यांच्या नेतृत्वाखाली विभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पावसाने उघडीप दिल्याने विभागनिहाय तीन ठेकेदार नियुक्त करून वेळेत खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा बांधकाम विभागाने केला आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर बेजार झाले आहेत. या खड्ड्यांचा पालकमंत्री भुसे यांनी शनिवारी स्वत:च अनुभव घेतला. शहरात विविध रस्त्यांचा पाहणी दौरा करीत पालकमंत्री भुसे यांनी खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे येत्या पंधरा दिवसांत बुजवून नाशिक खड्डेमुक्त करावे, असे निर्देश भुसे यांनी दिले. त्यानंतर आयुक्त डॉ. करंजकर यांनी बांधकाम विभागाची कानउघडणी करत पालकमंत्र्यांच्या निर्देशांनुसार खड्डे बुजविण्यासाठी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार बांधकाम विभागाने रविवारपासून शहरातील सहा विभागांतील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रत्येक विभागात उपअभियंता यांच्या दिमतीला असून, या विभागातील प्रत्येकी दोन कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सर्वेक्षण करून अहवाल सादर केले जाणार आहेत. सर्वेक्षण करतानाच खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक विभागासाठी तीन ठेकेदार नियुक्त केले असून, त्यांच्याकडून खड्डे बुजविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. लायबलिटी पिरियडमधील ३९ रस्त्यांबाबतही ठेकेदारांना निर्देश देण्यात आले आहेत.

—स्मार्ट सिटी कंपनीलाही इशारा

चोपडा लॉन्स परिसरात स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रलंबित कामामुळे एकाचा बळी गेला आहे. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी पाहणी केली होती. त्यामुळे वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट कंपनीला इशारा दिला आहे. ठेकेदाराला यापुढे मुदतवाढ देऊ नका, असेही स्मार्ट कंपनीला बजावण्यात आले आहे.

पालकमंत्री आणि आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे बुजिवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सर्वेक्षण केले जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी विभागनिहाय ठेकेदार निश्चित करून काम सुरू केले आहे.

– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन appeared first on पुढारी.

Exit mobile version