Site icon

नाशिक : चांदवड, देवळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – राहुल आहेर

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : चांदवड व देवळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ दुष्काळाच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. डॉ. राहुल आहेर व भाजपा नाशिक लोकसभा प्रमुख केदा आहेर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या यादीत चांदवड व देवळा तालुक्याचा समावेश नसल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे. दोन्ही तालुक्यात चालू वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात सुरू केलेले पिण्याच्या पाण्याचे टॅंकर आज देखील सुरू आहे. विशेषतः त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले पावसाअभावी उगवले देखील नाही. पर्यायाने शेतकरी संकटात सापडला आहे. अख्खा खरीप हंगाम वाया गेला असून रब्बी हंगाम देखील वाया जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर घर, कुटुंब चालवायचे कसे, जनावरांना चारा, पाणी आणायचे कुठून यांचा गंभीर प्रश्न पडला आहे.

चांदवड व देवळा तालुक्यातील दुष्काळाची दाहकता ओळखून दोन्ही तालुके दुष्काळी घोषित करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी आमदार डॉ राहुल आहेर, केदा आहेर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चांदवड, देवळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा - राहुल आहेर appeared first on पुढारी.

Exit mobile version