Site icon

नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथून जवळच असलेल्या जाखोरी गाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जाखोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने आतापर्यंत अनेक शेळ्या व कुत्रे यांच्यावर हल्ला करून फस्त केले होते. जाखोरी परिसरात राहणारे डॉ. बबलू सय्यद यांच्या शेताजवळ सदर बिबट्याचे दर्शन होत होते. बिबट्याने दोन दिवसांपूर्वीच दोन कुत्रे फस्त केले होते. या घटनेनंतर डॉ. सय्यद यांनी वनविभागाचे अधिकारी अनिल आहेर यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावला. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सकाळी सय्यद नेहमीप्रमाणे शेतीवर गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी आहेर यांच्याशी संपर्क साधून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती दिली. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, या भागात आणखी दोन ते तीन बिबटे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील काही भागांत पथदीप बंद असून, त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन बिबटे येतात. यामुळे बंद पथदीप सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Exit mobile version